कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरणाला गती देण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि रात्रीच्या वेळी विमान सेवा सुरू करण्यासाठीची यंत्रणा येत्या वर्षभरात पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन आणि उद्योग वाढीस चालना मिळेल.
सातारा, 31 जानेवारी 2024: कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन आणि उद्योग वाढीस चालना मिळेल, असे ते म्हणाले.
साताऱ्यात आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री देसाई बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवनसंरक्षक आदिती भारव्दाज, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक संतोष नलावडे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरण हा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. 2012-13 मध्ये विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याची असणारी एक हजार 280 मीटरची धावपट्टी वाढवून ती एक हजार 700 मीटर करण्यात येणार आहे. यासाठी 48 हेक्टरचे भूसंपादन करण्यात आले आहे. जवळपास 62 टक्के खातेदारांना भूसंपादन पोटी निधी वितरित झाला आहे.
उर्वरित खातेदारांना पंधरा दिवसांची नोटीस देऊन भूसंपादनाची भरपाई स्विकारण्याचे आवाहन करावे, अशा सुचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या. भरपाईची रक्कम न स्विकारल्यास रकमेचा भरणा कोर्टात करण्यात येवून जमीन ताब्यात घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
एअरपोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडिया यांनी निर्धारित केलेल्या नियमानुसार जी बांधकामे, टॉवर्स अडथळा निर्माण करणारी ठरतील ती अतिक्रमणे काढण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही या बैठकीत पालकमंत्री देसाई यांनी दिले.
या निर्णयामुळे कऱ्हाड विमानतळाच्या विस्तारीकरणाला गती मिळेल आणि जिल्ह्यातील पर्यटन आणि उद्योग वाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.